अक्षराकडून चिन्हांकडे...
मानवाची निर्मिती कधी झाली हे नेमके सांगणे अर्थातच कठीण आहे. मला नेहमी कुतूहल वाटते की मानवाची निर्मिती झाल्यावर ते एकमेकांशी कशा पद्धतीने बोलत होते? किंवा व्यक्त होत होते? खाणाखुणा आणि इतरांना न्याहाळून त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून शिकणे अशा पद्धतीने त्यांचे व्यवहार चालत असावेत का? भाषा हा प्रकार तेव्हा नसणार, त्यामुळे कोणत्याही भाषेचे लेबल त्यांच्यावर लावता येणार नाही. परंतु मानवाचा जसजसा विकास होत गेला तशी आपापली एक भाषा / बोली तयार झाली असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या बोलण्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांची सरमिसळ असणार हे उघड आहे , परंतु आज जगात अस्तित्वात असलेल्या भाषा या नेमक्या ‘भाषा’ या प्रकारात कधी घडल्या गेल्या आणि त्या भाषांचा विकास होण्याची, त्या प्रगल्भ होण्याची प्रक्रिया नेमकी कधी व कशी झाली हेही सांगणे कठीण आहे. आपल्या मराठी भाषेबद्दल बोलायचे तर मराठीचा उगम हा पंधराशे ते चोवीसशे वर्षापूर्वीचा आहे असे मानले जाते. मात्र मराठी भाषा इसवी सनापूर्वीच अस्तित्वात होती असे म्हणणे प्रा. ह...