कथा माता, बालकांच्या उत्कर्षाची... (उत्तरार्ध)

   

डॉ. संजीवनी केळकर यांचं मनोगत

ग्रामीण महिलांनी चालवलेली महिलांसाठी काम करणारी महिलांची सेवाभावी नोंदणीकृत ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात १९७८पासून कार्यरत आहे.


केवळ सहसंवेदनेच्या पायावर उभ्या राहिलेल्या आणि महिलांनी जिद्दीने यशस्वी केलेल्या या परिवर्तन चळवळीचा प्रवास शब्दांकित करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘देवराई’. १९७८ ते २०२५ या कालखंडात या संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रवासाचं सिंहावलोकन करण्यासाठी मी मागे वळून पाहते तेव्हा माझं मलाच नवल वाटतं. कारण या प्रवासाची वाट रुळलेली नव्हती. या वाटेवर धोक्याची वळणं होती. कधी पायाखाली रुतणारे काटे होते. कधी हिरवळही होती. कधी पावसाचा प्रसन्न शिडकावा. तर कधी मुसळधार पाऊस. कधी तप्त सूर्याचे प्रखर किरण. तर कधी क्वचित मिळणारी थंडगार सावली. याशिवाय या प्रवासाचा पल्लाही खूप लांबचा होता. हे सगळं ‘साहून’ मी कशी काय तग धरून राहिले? काय होतं माझ्याजवळ? माझं माहेर संपन्न. सुसंस्कृत आणि माणुसकी जपणारं होतं. आजही आहेच. आजही संस्थेच्या कुठल्याही कामाला गोडबोले मंडळींचं नेहमीच सहकार्य असतं. माझ्या आईवडिलांनी लावलेलं शिस्तीचं वळण. केलेले संस्कार आणि माया यांशिवाय हुजूरपागा या माझ्या शाळेचं मला मिळालेलं मार्गदर्शन ही सगळी शिदोरी माझ्याजवळ होती. ध्येय गाठण्यासाठी पायपीट करताना ज्या ऊर्जेची गरज होती ती केळकर कुटुंबीयांनी दिली होती. धोक्याच्या वळणांवर हितचिंतक. सल्लागार. देणगीदार असे मार्गदर्शक मिळालेच. पण विशेष म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण स्त्रीनेदेखील परिवर्तनासाठी आमच्या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद दिला. 

 या वाटेवर कसं चालावं? तिचा राजरस्ता होईल का? या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. माझ्याकडे समाजकार्याचा आणि ग्रामीण जनतेबरोबर काम करण्याचा अनुभवही नव्हता. कोणत्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नव्हतं. आर्थिक पुंजी नव्हती. की कोणी पूर्णवेळ कार्यकर्ते नव्हते. खरं तर मला वेळसुद्धा नव्हता. मात्र ग्रामीण स्त्रीचे डोळे पुसून तिला हसतमुख करण्याची असोशी होती. जगात सत्‌शक्ती आहे ही श्रद्धा होती. ग्रामीण स्त्रीबद्दलची सहसंवेदना ही प्रेरणा होती आणि मी एक चांगली मैत्रीण नक्की होऊ शकते असा स्वतःवर विश्वास होता.

 


१९७५मध्ये डॉक्टर म्हणून घरच्याच हॉस्पिटलमध्ये मी कामाला सुरुवात केली तेव्हा सांगोला तालुक्यात मी एकमेव आणि पहिली स्त्री डॉक्टर होते. स्वाभाविकच माझ्याकडे तालुक्यातील सर्व खेड्यांतून सर्व स्तरांवरील महिलावर्ग तपासणीसाठी आणि उपचारांसाठी मोठ्या संख्येने येऊ लागला. त्यांना मी नेहमीच मैत्रिणी मानलं. त्यामुळे त्यांच्या शारीरिक दुखण्यांबरोबर त्यांच्या मनातले सलही त्या मोकळेपणाने बोलू लागल्या. जसजसं त्यांचं भावविश्व माझ्यापुढे उलगडत गेलं. तसतशी त्यांच्या व माझ्या जीवनशैलीत असलेली प्रचंड तफावत माझ्या लक्षात आली आणि ती मला अस्वस्थ करू लागली. पिढ्यान्‌्पिढ्या लाथाबुक्क्यांचे उन्हाळे सोसत आणि वेदनांचे सोहाळे करत या ग्रामीण महिला जगत आल्या आहेत. या त्यांच्या जीवनशैलीत परिवर्तन घडवून आणण्याची खूप गरज होती आणि आजही आहे.

 

काय करावं लागेल परिवर्तनासाठी आपल्याला? लोकांचा विश्वास बसला पाहिजे आपल्यावर. आपण जे बोलतो तेच करतो याची खात्री लोकांना झाली तर परिवर्तनाचा मार्ग सोपा होईल. पण हे काम माझ्या एकटीचं नाही असं लक्षात आलं. त्यामुळे मी सहकारी शोधत राहिले. माझ्या पेशंट्‌सपैकी नीला देशपांडे आणि प्रतिभा पुजारी या सुशिक्षित महिलांशी विचारविनिमय झाल्यावर ‘आम्ही समविचारी आहोत’ हे सहजच कळलं. आणि समाज परिवर्तनासाठी प्रथम महिलांचं संघटन करू या असं ठरलं. मग आम्ही तिघींनी महिलांची साप्ताहिक बैठक सुरू केली. खरं तर जाचक रूढी. परंपरा. कर्मकांडाचं अवडंबर असा तो काळ होता. महिलांना घराबाहेर पडण्यासाठी परवानगी मिळणंही कठीण होतं. डॉ. दादा तथा व्यं. शि. केळकर यांची मी सून असल्यामुळे त्यांची पुण्याई पाठीशी होती. त्यामुळे महिला जमा करणं मला सहज शक्य झालं कारण लोकांना ‘त्यांच्या घरातील महिला माझ्याबरोबर सुरक्षित राहतील’ याचा विश्वास होता. नीलाताईंना विद्यार्थी परिषदेच्या कामाबद्दल माहिती होती. प्रतिभाताईंना राष्ट्र सेविका समितीची पार्श्वभूमी होती. 

 


ही आमची साप्ताहिक बैठक सांगोल्यात लवकरच लोकप्रिय झाली आणि तिचं नामकरण आम्ही ‘महिला सहविचार केंद्र’ असं केलं. सर्व स्तरांतील महिला अगदी आवडीने या उपक्रमात भाग घेऊ लागल्या. त्यामुळे आमची संचालकांची ‘तीन’ ही संख्या हळूहळू वाढायला लागली. आम्ही तिघींनी जमलेल्या महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा. त्यांना स्वतःलाच त्यांच्या समस्या कळाव्यात. तसंच त्या कशा सोडवाव्यात हेही कळावं अशा दृष्टीने आम्ही विचारपूर्वक केलेल्या उपक्रमांमध्ये या महिला सहभागी होऊ लागल्या. हळूहळू या सहविचार केंद्राला ‘पाणवठ्या’चं रूप येऊ लागलं. महिला एकमेकींशी बोलू लागल्या. एकमेकींत सल्लामसलत होऊ लागली. आपल्या समस्या काय आहेत हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं आणि त्यांवरील उपाययोजनेसाठीसुद्धा त्या स्वतःच निर्णय घेऊ लागल्या. आम्हां तिघींवरचा त्यांचा विश्वास वाढला आणि माझ्याकडे नेतृत्व आलं. त्यानंतर आवडीने नियमित येणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेली. 

 

योगायोगाने सुरुवातीच्याच काळात दासबोधाच्या अभ्यासक अंजली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही बऱ्याच जणींनी दासबोधाचा अभ्यास केला. हाही शुभसंकेत होता असं मला वाटतं. त्यामुळे भावी संचालकांची मानसिक बैठक कामासाठी कळत नकळत तयार झाली. हा समर्थांचा आशीर्वाद समजून १९७९मध्ये दासनवमीला संस्थेचा ‘जिजामाता बाल संस्कार केंद्र’ हा पहिला उपक्रम सुरू केला आणि समर्थ रामदास स्वामी आमचे ‘कुलगुरू’ झाले. 

 

महिला सहविचार केंद्रामुळे अनेक झाकली माणकं प्रकाशात आली आणि यापुढील सर्व कामांसाठी महिला सहविचार केंद्र ही कार्यकर्त्यांची जणू गंगोत्रीच ठरली. जसजसं काम वाढू लागलं तसतशा या गंगोत्रीमुळे अनेक चुणचुणीत मुली. कार्यकर्त्या 1 कर्मचारी म्हणून मिळत गेल्या. आणि त्यांनीच महिला सबलीकरण. दर्जेदार शालेय शिक्षण आणि जलसंधारण हे संस्थेचे तीन कार्यबिंदू यशस्वी केले आणि आताही करत आहेत.

 

‘महिला सबलीकरण’ हा कार्यबिंदू आम्ही फक्त आर्थिक स्वावलंबनापुरता सीमित ठेवला नाही. तर. आरोग्यरक्षण. अन्यायाविरुद्ध संघर्ष. कौशल्य विकसन. आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण रक्षणाचं भान हे पाचही मुद्दे गरजेचे मानले. आरोग्यरक्षणाबाबत विनामोबदला सेवा पुरवणं माझ्या हातात होतं. त्यामुळे प्रथम ‘आरोग्य’ हा कार्यबिंदू ठरवला आणि अनेक शिबिरं आयोजित केली. 

 

राष्ट्राच्या अन्नधान्य उत्पादनात या कष्टकरी महिलांचा ५० टक्के वाटा आहे. मात्र त्यांच्या कष्टांकडे म्हणावं तसं कोणाचं लक्ष नाही. ७०-८०च्या दशकात सरकारच्या कोणत्याही विशेष योजना ग्रामीण स्त्रीसाठी आलेल्या नव्हत्या. ‘महिला सबलीकरण’ हा शब्द रूढ व्हायच्या आधीच आम्ही सबलीकरणासाठी बहुआयामी दृष्टिकोन ठेवला होता. महिला अन्याय निवारण समिती आणि बचत गट या दोन्हींचा सबलीकरणामध्ये सिंहाचा वाटा आहे. अनेक अन्यायग्रस्त महिलांना आम्ही दिलेल्या धीरामुळे. व्यवसाय प्रशिक्षणामुळे आणि बचत गटातून व्यवसायासाठी भांडवल म्हणून मिळणाऱ्या कर्जामुळे बाईची किंमत वाढली. हिंमतही वाढली. तिच्या कुटुंबाच्या निर्णयप्रक्रियेत तिला स्थान मिळालं. गावच्या राजकारणातही काही हुशार महिलांनी पद आणि सन्मान दोन्ही मिळवलं. 

 


१९८३मध्ये शाळा सुरू करताना मन-मनगट-मेंदू विकसित करणारी. माणूस घडवणारी शाळा उभारण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं. आपल्या दुष्काळग्रस्त. मागास सांगोल्यात दर्जेदार शिक्षण कसं देता येईल? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी अनेक अनुभवी शिक्षणतज्ज्ञांना भेटले. त्यांच्याशी अनेक वेळा विचारविनिमय केला. त्यांच्या शिक्षणसंस्थांना भेटी दिल्या आणि या तज्ज्ञ लोकांनी हातचं न राखता त्यांचे अनुभव आणि शिक्षणाबद्दलची मतं दिली. आम्ही सांगोल्याच्या मर्यादा लक्षात घेऊन ‘या मातीत सहज रुजेल’ अशी शिक्षणप्रणाली या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली. आरंभापासून सहकार्य करणाऱ्या शलाका सोमण. गायत्री सेवक, निर्मलाताई पुरंदरे, हेमा होनवाड, अदिती नातू या शिक्षणतज्ज्ञांचा उल्लेख केल्याशिवाय हे मनोगत पूर्णच होऊ शकत नाही. अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक या दोघींनी जे बालशिक्षणाचे प्रयोग केले त्या सर्व कामाची ‘लीगसी’ आता ग्राममंगल संस्थेकडे आहे. आनंददायी शिक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली ज्ञान प्रबोधिनीच्या गायत्री सेवक यांनी. ज्ञानरचनावादाचं ग्राममंगलचं मोड्यूल आम्हांला त्यांनीच परिचित करून दिलं आणि मग आमच्या शिक्षकांना प्रत्यक्ष ऐन्याला पाठवून प्रशिक्षण दिलं. त्यामुळे सर्व शिक्षक बालशिक्षणाच्या चळवळीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झाले आणि म्हणून आमची शाळा आगळीवेगळी ठरली.

 

१९८३ साली सुरू झालेलं छोटंसं ६० विद्यार्थ्यांचं बालक मंदिर आता ३६ अध्ययन कक्ष असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत पोचलं आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा अनेक देणगीदारांच्या देणग्यांमधून उभ्या राहिल्या आहेत. यामध्ये सिंहाचा वाटा श्री. अँड्र्यू लेडरर यांचा आहे.  

 

आमचा तिसरा कार्यबिंदू ‘जलसंधारण’. २००५ साली प्रथमच एका देणगीतून जलसंधारणासाठी आर्थिक निधी उभा राहिला. सांगोला तालुक्यातील संगेवाडी या खेड्यात आम्ही प्रशिक्षित केलेल्या महिला सरपंचांच्या उत्साही नेतृत्वामुळे आणि ‘गंगोत्री’च्या सहकार्याने सर्व्हे करून कोरड्या असलेल्या गावओढ्यात छोटा बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे गावच्या विहिरी आणि सभोवतालच्या २२ विहिरी पाण्याने गच्च भरल्या. या बंधाऱ्यातून प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी आणखीही बंधारे बांधले. संगेवाडीतील बंधारा म्हणजे सांगोला तालुक्यातील ‘संघटित स्त्री शक्तीची’ पहिली साक्ष आहे. त्यानंतर सेवावर्धिनीच्या अमूल्य सहकार्यामुळे वाटंबरे आणि गार्डी या दोन्ही दुष्काळग्रस्त गावांत पाझर तलाव आणि जुने बंधारे दुरुस्त करून व नवीन बंधारे बांधून अनुक्रमे १३०० आणि ८०० हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. सांगोल्यातील हरितक्रांतीच्या आगमनाची ही रुणझुण आहे असं मी मानते. 

 

सन २००७-०८ या वर्षात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आमच्या संस्थेची ‘संस्था बांधणी’ या प्रशिक्षणासाठी निवड केली. आणि आमचा ‘makeover’ झाला. संस्थेसाठी आवश्यक ते दप्तर ठेवणं, website, लोगो, सोशल मीडिया, FCRA, Vision, Mission इत्यादी बाबींसाठी मार्गदर्शन मिळालं. या प्रशिक्षणानंतरही श्री. विनयजी सहस्रबुद्धे. श्री. विवेकजी अत्रे आणि अमेरिकास्थित श्री. नारायण चांडकजी या सर्वांनी संस्थेसाठी सदैव सहकार्य केलं. सेवा सहयोगनेही वेळोवेळी आम्हांला आवश्यक प्रतिसाद दिला. मा. चंद्रकांतदादा पाटील यांचंही संस्थेस वेळोवेळी मार्गदर्शन असतं. 

 

संस्थेचे तीनही कार्यबिंदू- महिला सबलीकरण. दर्जेदार शिक्षण. जलसंधारण हे विविध पूरक उपक्रमांच्या आयोजनामुळे यशस्वी झाले आहेत. स्त्रियांनी संघटन करून गेली ४७ वर्षं सातत्याने केलेलं समाजकार्य लोकांसमोर आणलं पाहिजे असं माझं अंतर्मन अलीकडे मला म्हणत होतं. योगायोगाने २०२३मध्ये माझी भाच्ची राजमुग्धा (सौ. मुग्धा फडके) प्रथमच सांगोल्यात आली. त्या भेटीत ती शैलीदार लिहिणारी. संवेदनशील. तरल मनाची. तल्लख बुद्धीची लेखिका आहे हे लक्षात आलं आणि आम्ही तिला टिपलं. तिनेही लेखनाचं काम आनंदाने स्वीकारलं. तिने स्वतः अनेक वेळा सांगोल्यात येऊन. संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेऊन. या प्रवासाची सत्यकथा ‘देवराई’ या पुस्तकात लिहिली आहे. राजकारणातील नेत्यांचं. तत्त्वज्ञ समाजसुधारकांचं. विचारवंतांचं ग्रामीण स्त्रीच्या परिस्थितीकडे लक्ष जावं हाही या पुस्तकलेखनामागील हेतू आहे. याच पुस्तकावर आधारित ‘दिंडी परिवर्तनाची’ हा संस्थेविषयीचा माहितीपटही तयार झाला आहे.

तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा।

पूजा केली होय अपारा। तोषालागी॥

ही ज्ञानेश्वरीतील ओवी समोर ठेवून मी आजपर्यंत संस्थेचं काम सांभाळलं. माझं तन. मन. धन एवढंच नाही तर माझ्या वेदना. माझे अश्रू. माझे सुखाचे. आनंदाचे क्षण हे सारे त्या सर्वात्मक सर्वेश्वराला अर्पण करून संस्थेचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे संस्थेच्या कोणत्याही अडचणी मी माझ्या मानल्या. अर्थात सक्ती कोणाचीच नव्हती. मी स्वतःला स्वतःच घालून घेतलेली ती शपथ होती. खऱ्या अर्थाने या कामाची पहिली लाभार्थी मीच आहे. कारण हे काम करताना त्या सर्वात्मकाने आशीर्वाद दिला तो व्यापक मातृत्वाचा. समोरच्या वंचित चेहऱ्यांवर फुलून आलेलं समाधान आणि आनंदाने खुललेलं हास्य हेच माझं सुखनिधान झालं... आजही आहे. आता मी उतरणीच्या रस्त्यावर आहे. मनात निखळ समाधान आहे. आनंद आहे. कारण संस्थेने सुरू केलेल्या ग्रामीण परिवर्तनाच्या दिंडीतील ही पालखी कुशल हातांची पुढची पिढी दमदारपणे पुढे नेईल असा विश्वास मला आहे. साथीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही पालखी सतत विकासाच्या दिशेने नेण्याचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे. सत्‌शक्ती या पालखीची पाठराखण करेलच अशी माझी श्रद्धा आहे.


 

लेखिका मुग्धा फडके यांचे मनोगत

“राजू. नाना गोडबोले माहीत आहेत ना तुला? त्यांची मुलगी संजू सांगोल्यात असते. तिने सांगोल्यात खूप काम केलंय. शाळा. महिला सबलीकरण. पाण्याचे बंधारे इ.इ. ... ते तू बघावंस असं मला वाटतं. तुला आवडेल!” इति नीलाआत्या.

त्यावर माझं उत्तर. “आत्या. प्लीजच हं! सोशल वर्क असेल तर मला नाहीच यायचं. हल्ली लोक एखाद्याचा हात धरून रस्ता क्रॉस करतात आणि सोशल मीडियावर फोटो टाकतात. आम्ही मदत केली म्हणून! त्यामुळे सोशल वर्क या प्रकारावर माझा विश्वास नाही. त्यामुळे नकोच.”

“अगं. तुला पटेल असं खरंखुरं काम केलंय तिने. बघून तर ये एकदा.” पुन्हा नीलाआत्याने आग्रह केला. आणि एकदाची मी सांगोल्यात येऊन पोहोचले.

सगळं काम बघायला जेमतेम दोन दिवस वेळ मिळाला. या दोन दिवसांत अनुभवलं ते केवळ भारावलेपण!

असं होऊ शकतं?... लोक इतके एकमेकांसाठी जीव टाकतात?... शाळेला सुट्टी मिळाली तर मुलं रडतात?... शिक्षक नुसते दिसले तरी आनंदाने उड्या मारतात?... शाळेतल्या प्रत्येकाचं अक्षर छापील वाटावं इतकं सुंदर असू शकतं?... आणि त्यासाठी शिक्षक विशेष मेहनत घेतात?... इयत्ता दुसरी-तिसरीतली मुलं भाजीपाला पेरून. विकून दिवसाला ४५ हजारांचा टर्नओव्हर जनरेट करतात?... आठवी-नववीतली मुलं किचनमध्ये स्वयंपाक शिकतात. लाकूडकाम करतात?... इलेक्ट्रिक पॅनल्स बनवतात?... मुलींचंही हेच रूटीन?... बरं. आपापले पैसे शाळेच्या संचयनीमध्ये जमा करून आपापली फीदेखील भरतात?... याशिवाय इतर राज्यात संकट आलं असेल तर निधी गोळा करून त्यांना पाठवतात?...

हे अद्भुत होतं माझ्यासाठी तरी...

शिवाय वाटंबरे. संगेवाडी इथल्या पाणी बंधाऱ्यांच्या निर्मितीची गोष्ट. महिलांसाठीचं कौशल्य विकसन केंद्र. त्यातून शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या अनेक महिला. त्यांनी आपापली घरं आणि व्यवसाय कसे सावरले... त्याच्या कथा-कहाण्या. इतर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध याच महिला वेगवगेळ्या परिस्थितीत किती वेळा उभ्या राहिल्या. त्यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कहाण्या...

या सगळ्याच गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि ऐकून प्रचंड भारावलेली मी मुंबईत परतले. खरं सांगते. डोळ्याला डोळा लागेना...

हे कसं काय घडवलं असेल या सगळ्यांनी? त्यांना काहीच प्रॉब्लेम आला नसेल का? आणि जवळजवळ पन्नास वर्षं सातत्याने पुढेच जात राहणं. स्वतःबरोबरच सोबतच्या प्रत्येकाचा उत्कर्ष साधणं यासाठी काऽऽऽऽय लेव्हलच्या कष्टांमधून आणि मानसिक त्रासातून जावं लागलं असेल सगळ्यांना! Espicially संजूआत्याला! विशेषतः स्त्रियांसाठी काम करताना तिने कोणती अशी जादू केली की. जिथे एका छताखाली दोन बायकांचं एकमत होणं मुश्कील. तिथे सगळ्या जणींचे आचार आणि विचार एकाच दिशेने काम करू लागले...?

अर्थात या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात मिळणार नव्हतंच. सगळं मुळापासून समजून घ्यायला हवं होतं... आणि...

७ जानेवारी २०२३. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस उजाडला. “हे सगळं लोकांपुढे यायला हवं आत्या. निदान छोटे छोटे व्हिडिओ आणि त्याबद्दल माहिती- असं सोशल मीडियावर पोस्ट करता येईल. मी करू का?” असं विचारायला संजूआत्याला फोन केला. आणि “अगं राजू. संस्थेच्या कामाचं डॉक्युमेंटेशन असावं आणि ते लोकांपुढे यावं असं वाटतंय. तर तू लिहू शकशील का?” तिने विचारलं. मी कशाला नाही म्हणतेय? माझी या कामाबद्दलची उत्सुकता. नवीन काहीतरी करायची खुमखुमी. आणि समोर वेगळ्या लिखाणाची चालून आलेली संधी अशा तिहेरी गोष्टी जुळून आल्या. आता सगळं मुळापासून समजून घेण्याचा आणि त्यासोबत स्वतःला बदलण्याचा एक अद्भुत प्रवास सुरू झाला माझाही!

जानेवारी २०२३पासून सप्टेंबर २०२४पर्यंतचा पावणेदोन वर्षांचा काळ चांगलाच गुंतवून ठेवणारा होता.


सगळ्यांशी बोलणं. त्यांच्या मुलाखती घेणं. रेकॉर्डिंग्ज पुन्हापुन्हा ऐकणं. सगळ्या प्रवासातलं मर्म समजून घेऊन ते सोप्या शब्दांत मांडणं सुरू होतं. हे सगळं आयुष्यात प्रथमच करत होते मी. त्यामुळे सतत तपासून बघण्याचा उद्योग संजूआत्याच्या मागे होताच. जो तिने बारकाईने केल्यामुळे लिखाण निर्दोष होण्यास मदत झाली. अर्थात यात संस्थेच्या पूर्वीपासूनच्या पदाधिकाऱ्यांची मदत झालीच. शिवाय काही कारणास्तव मूळ प्रकाशक बदलण्याचा कटू निर्णय घेताना झालेला वैचारिक गोंधळ दूर करतानादेखील श्री. राजेंद्र लेले यांची मदत झाली. या काळात नीलाआत्या आणि भावेकाका दोघंही खूप खंबीरपणे पाठीशी उभे होते. पुस्तकाशी संबंधित बऱ्याच भेटीगाठी संजूआत्या पुण्यात असताना व्हायच्या. त्यामुळे पुण्यात मुक्काम ठरलेला. आणि या दोघांनी माझे अतोनात लाड करणं हेही ठरलेलं.

एरवी निवेदिका. ब्लॉग लेखिका. सूत्रसंचालन. नाट्यनिर्माती. अभिनेत्री. दिग्दर्शिका अशा कामांत मन रमवणारी मी. पण मुंबईबाहेर कधीच एकटीने प्रवास न केलेली मी... या पुस्तकाच्या निमित्ताने एकटीने बिनधास्त प्रवास करू लागले. समोरच्या माणसाचं म्हणणं अधिक सजगतेने ऐकू लागले. समाजात वावरताना डोळसपणे सगळं बघून समजून घेऊ लागले. कामांचं नियोजन अधिक कुशलतेने करू लागले. एकाच वेळी अनेक कामं करण्याची सवय होऊ लागली. त्याची भीती किंवा दडपण वाटेनासं झालं- हे मलाच जाणवलेले ठळक बदल!

आणि यात अगदी कळीचा मुद्दा होता. तो माझ्या कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्याचा. माझे पती मंदार आणि मुलं आलाप. ओजस या तिघांनीही माझं बदललेलं रूटीन सहज स्वीकारलं. कितीतरी वेळा डबा. नाश्ता वेळेवर झाला नाही. कधीकधी तर झालाच नाही. पण एका अक्षराने कुणीच नाराजी दाखवली नाही. उलट. “तू तुझ्या कामावर लक्ष दे! आम्ही मॅनेज करू” हेच म्हणणं होतं तिघांचंही! आणि माझ्या दोन्ही मदतनीस सखी शिल्पा आणि अर्चना यांनी. मी मुंबईत नसताना. माझं घर आणि कुटुंब मनापासून सांभाळलं. शिवाय माझा भाऊ सचिन आणि बहीण तनुजा यांचा मॉरल सपोर्ट होता. त्यामुळे या प्रोसेसमध्ये मी कितीतरी वेळा थकले. खचले. पण त्यांनी आणि नीलाआत्या. भावेकाका. मंदार या तिघांनीही मला थांबू दिलं नाही. पुन्हा नव्याने उभं राहायला मदत केली.

आधीपासून मला लिहितं करणारे महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे माजी संपादक श्री. अशोक पानवलकर सरांनी या पुस्तकाचं मूळ लिखाण वाचून प्रोत्साहन दिलं... आणि फायनली “देवराई” पूर्ण झालं!

गोष्ट इथे संपत नाही. तर सांगोल्यातल्या ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेने जे काम केलंय. त्यापासून प्रेरणा घेऊन जर खेडोपाडी हे मॉड्यूल वापरण्यात आलं. तर हे पुस्तक लिहिण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला असं म्हणता येईल. हे म्हणण्याची संधी भविष्यात वारंवार मिळो अशी पांडुरंगालाच विनंती करते.


टिप्पण्या