MAI चे पुढचे पाऊल ...“The MAI Store”

मराठी भाषेचे शिक्षण व प्रसार, मराठी सण जपणारे व ती संस्कृती नवीन पिढीमध्ये रुजविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि  जुन्यानव्या पिढीमध्ये सुसंगती राखण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम अंमलात आणण्यासाठी त्यासाठी कोणी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टोअर सुरू करू शकते का? MAI चे उपक्रम आणि एक वस्तूंचे विक्री केंद्र याचा काय संबंध असा प्रश्न तुमच्य मनात लगेच आला असेल.  परंतु मराठी आई उपक्रमाने अतिशय योग्य वेळी हे योग्य पाऊल उचलले आहे. मराठी आई इनिशिएटव्ह काय आहे हे मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिलेच आहे. (https://panvalkar.blogspot.com/2026/02/blog-post_26.html) थोडक्यात सांगायचे तर आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या तरुणीला आधी आई झालेल्या स्त्रीने दिलेला 'आई'चा प्रेमाचा, मदतीचा हात म्हणजे मराठी आई इनिशिएटिव्ह. 


सुरुवातीला आठ-दहा महिलांपुरता मर्यादित असणारा हा उपक्रम १५०० पेक्षा अधिक आयांपर्यंत पर्यंत कधी पोहोचला हे त्याच्या 
दोघी सहनिर्मात्या डॉ. सायली नातू आणि  क्षितिजा करमरकर यांना कळलेही नाही. पण एकदा ही संख्या वाढत गेल्यानंतर त्या सर्व महिलांच्या या विषयातील गरजा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून या दोघींनी MAI झपाट्याने वाढवत नेला. उत्तर अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे चालू आहे आणि त्याची दखल जगभर घेतली जात आहे. कारण कोणत्याही स्त्रीचे आईपण हे तिच्या राष्ट्रीयत्वावर अवलंबून नसते. आई ही 'आई'च असते. या महिलांसाठी विविध कामे करताना अर्थात पैसे लागतात आणि पैशाचे सोंग कधीही आणता येत नाही. MAI उपक्रम विना नफा तत्वावर चालवला जातो, पण याचाच पुढचा भाग 'विना तोटा' असाही आहे. त्याचेही भान ठेवावे लागते. 

 त्यामुळे नियमित उत्पन्न योग्य मार्गातून मिळत राहील अशा विचाराने नेहा जोशी (हेड ऑफ प्रॉडक्ट, स्टोअर अँड कम्युनिकेशन्स) यांनी  ही जबाबदारी सांभाळतानाच  MAI Store ची कल्पना मांडली आणि सर्वांनी या वेगळ्या कल्पनेला  मनापासून पाठिंबा दिला. ही योजना कागदावरच राहिली नाही.  परवाच्या आठ मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनी कॅलिफोर्निया येथील बे एरियामध्ये झालेल्या एका महिला मेळाव्यात ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. “The MAI Store” ची घोषणा राष्ट्रीय स्तरावर सात मार्च रोजी Instagram Live द्वारे करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बे एरिया पिकनिकमध्ये स्टोअरच्या पहिल्या merchandise ची प्रत्यक्ष विक्री झाली.. MAI च्या सदस्य असणाऱ्या जवळपास शंभर महिला व त्यांच्या कुटुंबियांनी या स्टोअरला भेट दिली आणि किमान ५० टक्के वस्तूंची खरेदीही केली. 

 

उभ्या - (डावीकडून) श्रुतिका सुतार, केतकी साठे, चैत्राली काळे, नेहा जोशी, सायली नातू, 
बसलेल्या (डावीकडून) - कश्मिरा पुराणिक, मृण्मयी पटवर्धन, ऋग्वेदा पांडे.
याशिवाय क्षितिजा करमरकर आणि मेघा खैरनार याही नव्या उपक्रमात महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.  
  

विक्रीचे संपूर्ण उत्पन्न हे MAI  उपक्रमासाठी जाणार असल्यामुळे मूळ उपक्रमालाही मोठे आर्थिक बळ मिळणार आहे. पैशासाठी बाहेर कुठेही हात पसरावा लागू नये अशी नेहा जोशी यांची भावना होती. ''आमच्या कार्यक्रमांसाठी आम्हीच पैसा गोळा करावा अशी कल्पना त्यामुळेच मनात आली. १५०० च्या वर ज्या बायका आमच्याकडे जोडल्या गेल्या आहेत त्यांच्याकडे स्वतःचे टॅलेंट आहे त्याचा उपयोग करून घेऊन ही स्टोअरची कल्पना अधिक सक्षमपणे राबवता येईल असा मला विश्वास आहे' असे नेहा जोशी आवर्जून सांगतात. काही दिवसातच महिलांच्या या टॅलेंटचा उपयोग करून येण्यात येईल. ज्या महिलांचे स्वतःचे काही उद्योग आहेत, मग ते लघुउद्योग असोत अथवा मध्यम आकाराचे असोत,  त्यांच्या उत्पादनांनाही या स्टोअरमध्ये स्थान मिळेल आणि याची विक्री केवळ ठराविक भागापुरती नव्हे तर देशभर होऊ शकते. MAI Shopify प्लॅटफॉर्मवर याबद्दलचा तपशील उपलब्ध होईल. तसेच नवनवीन प्रॉडक्ट कुठले येत आहेत त्याविषयी माहिती देण्यात येईल. या स्टोअर उपक्रमाशी कोणाला पार्टनरशिप करायची असेल तर विविध उद्योजक किंवा व्यक्ती यांना यात सामावून घेतले जाईल. 

 

या उपक्रमासाठी MAI च्या सहनिर्मात्या सायली नातू आणि क्षितिजा करमरकर यांनी नेहा जोशी यांना मार्गदर्शन केले. नेहा जोशी म्हणाल्या, “या स्टोअरच्या उभारणीमागे एक पूर्णतः समर्पित टीम आहे आणि त्यांच्या योगदानाशिवाय हे शक्य झाले नसते.” त्यांच्याबरोबर केतकी साठे (Vendor Management), कश्मिरा पुराणिक (Merch and website Designer), मेघा खैरनार (Merch Designer) तसेच मृण्मयी पटवर्धन, चैत्राली काळे, श्रुतिका सुतार आणि ऋग्वेदा पांडे स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.  


MAI  स्टोअर
चे मला कौतुक कशासाठी वाटते की आधी एखादा उपक्रम सुरू करायचा, त्याची लोकप्रियता बघून तो वाढवत न्यायचा आणि आर्थिक प्रश्न आल्यानंतर तो उपक्रम बंद करायचा, असे जेव्हा घडते  तेव्हा खूप वाईट वाटते. कारण कोणत्याही उपक्रमाला किमान पैसा हा लागतोच, तो उभा कसा करायचा, तोही  केवळ एक दोनदा किंवा एखाद्या महिला मेळाव्यासाठी नव्हे तर पुढील अनंत काळासाठी हा प्रश्न सोडवणे वाटते तितके सोपे नाही. MAI च्या सर्व सदस्यांनी हा धोका ओळखला व आर्थिक स्वयंशिस्तीचे हे पाऊल वेळीच उचलले.  म्हणूनच या नव्या उपक्रमाचे स्वागत करावे तेवढे थोडेच आहे. 
 
स्टोअरसंबंधात संपर्क करायचा आहे ? त्यासाठी store@marathiaai.org हा ईमेल आयडी तुमच्यासाठीच तयार केला आहे.   
 
 

टिप्पण्या

  1. ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आधीच्या लेखात वाचलं होतं; उपक्रमाची आर्थिक आघाडी देखील चांगलं 'बाळसं' घेताना दिसत्ये. छान. 👍😊

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा