अक्षराकडून चिन्हांकडे...

 मानवाची निर्मिती कधी झाली हे नेमके सांगणे अर्थातच कठीण आहे.  मला नेहमी कुतूहल  वाटते की मानवाची निर्मिती झाल्यावर ते एकमेकांशी कशा पद्धतीने बोलत होते? किंवा व्यक्त होत होते?  खाणाखुणा  आणि इतरांना न्याहाळून त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून शिकणे अशा पद्धतीने त्यांचे व्यवहार चालत असावेत  का?  भाषा हा प्रकार तेव्हा नसणार, त्यामुळे कोणत्याही भाषेचे लेबल त्यांच्यावर लावता येणार नाही. परंतु मानवाचा जसजसा विकास होत गेला तशी आपापली एक भाषा / बोली  तयार झाली असे म्हणायला हरकत नाही.  सुरुवातीच्या बोलण्यामध्ये  वेगवेगळ्या शब्दांची  सरमिसळ असणार हे उघड आहे , परंतु आज जगात अस्तित्वात असलेल्या भाषा या नेमक्या ‘भाषा’ या  प्रकारात कधी घडल्या गेल्या आणि त्या भाषांचा विकास होण्याची, त्या प्रगल्भ होण्याची प्रक्रिया नेमकी कधी व कशी झाली हेही सांगणे कठीण आहे.  आपल्या मराठी भाषेबद्दल बोलायचे तर मराठीचा उगम हा पंधराशे ते चोवीसशे वर्षापूर्वीचा आहे असे मानले जाते. मात्र मराठी भाषा इसवी सनापूर्वीच अस्तित्वात होती असे म्हणणे प्रा. हरी नरके यांनी मांडले होते.  इसवी सनापूर्वी २०७ यावर्षी ब्राह्मणी लिपी परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत,  असे त्यांचे म्हणणे  होते. या सगळ्या वादात न पडता आपण असे म्हणू शकतो की मराठी भाषेला किमान अडीच हजार वर्षांचा  इतिहास आहे. इतक्या प्रदीर्घ काळात मराठी भाषा म्हणून बदलत गेली असणार हे उघड आहे. मराठी भाषा कशी बदलत गेली आणि आज २०२६ मध्ये मराठीची काय अवस्था आहे हा मोठा संशोधनाचा विषय ठरावा.



सुरुवातीच्या काळात संवादाचे अथवा एखादी महत्त्वाची नोंद ठेवण्याचे साधन शिलालेख हे होते. पहिला शिलालख कधी सापडला व त्यावरून मराठी भाषेचा उगम कसा शोधता येतो, याबद्दल भाषातज्ञांमध्ये मतभेद आहेत. त्यात आता पडण्यात अर्थ नाही.  परंतु मी याकडे कोणतीही भाषा ही परस्परसंवादाचे माध्यम असते या दृष्टीने बघतो. इसवी सन १०१२ मध्ये मराठीतील पहिला शिलालेख सापडला असा उल्लेख सापडतो, हा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ अलिबाग चौल  रस्त्यावरील अक्षी या गावात आढळलेला आहे.  पुरातत्त्वज्ञ डॉ.  तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो मराठीतील पहिला शिलालेख आहे. एखादी माहिती देण्यासाठी नोंद म्हणून या शिलालेखाचा वापर तेव्हा होत असणार. शिवाय  परस्परसंवादाचे ते महत्वाचे  अधिकृत लिखित माध्यम असावे. 

मराठी भाषेचा उगमाचा काळ हा नेमका सांगणे जसे कठीण आहे तसेच पहिले छापील मराठी पुस्तक नेमके कोणते हे सांगणेही कठीण आहे.  असे म्हणतात की पूर्वी रोमन लिपीत असणारी भगवद्गीता १८०५ मध्ये देवनागरी भाषेत मुद्रित झाली.  पहिली देवनागरी भाषेतील मुद्रण  प्रत महाराष्ट्रातल्या मिरज येथे असून त्याला २०० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. ही माहिती इंटरनेटवर मिळत असली तरी याआधीही मराठी पुस्तके छापून येत होती असे उल्लेखही विविध संदर्भात सापडतात. एका पुस्तकात असाही उल्लेख आढळला की, 'मराठी भाषेतील पहिले छापील पुस्तक सन १६१६मध्ये फादर स्टिफन्स यांचे क्रिस्तपुराण हे होय. त्यात त्यांनी मराठीचे कौतुक करणारी एक कविताही केली आहे. पहिले पुस्तक नेमके कोणते त्याच्या तपशिलात न जाता आधी शिलालेखावर असलेली मराठी भाषा नंतर हस्तलिखित पुस्तकांवर, नंतर मुद्रित पुस्तकांच्या रूपाने आपल्यासमोर आली आणि त्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ मध्ये ‘दर्पण’ या नावाने मराठी वर्तमानपत्र प्रसिद्ध केले आणि ही मराठी भाषा वर्तमानपत्रीय झाली. परस्परसंवाद अधिक व थेटपणे वाढवणारी ठरली, असे म्हणायला हरकत नाही. त्या सगळ्या काळात लोकांचे प्रबोधन करणे हा प्रमुख हेतू असे आणि सगळ्या संत मंडळींनी या भाषेद्वारे प्रबोधनाचे काम खूप मोठ्या प्रमाणावर केले.  संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, संत बहिणाबाई इथपासून ते ज्याना आधुनिक संत म्हणता येईल अशा गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, गोंदवलेकर महाराज आदी मंडळींनी हे प्रबोधनाचे काम मराठी भाषेत चालू ठेवले. संतांची यादी खूप मोठी आहे आणि प्रत्येकाचा उल्लेख करणे अशक्य आहे.

सगळ्या संतांनी अध्यात्म आणि मानवी मूल्यांची शिकवण देण्याचे काम केले आणि त्याद्वारे समाज घडवला हे करताना अर्थातच त्यांनी मराठी भाषेचा अत्यंत सुंदर असा उपयोग केला. लोकांना काही सांगण्यासाठी आणि त्यांना विविध मूल्यांची शिकवण देण्यासाठी संतांनी निर्माण केलेले साहित्य आजही प्रमाण मानले जाते. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकाराम गाथा, दासबोध, मनाचे श्लोक या व इतर अशा असंख्य ग्रंथांनी कित्येक काळ समाजाला घडवले. अर्थात हे करताना या संत मंडळींच्या पुढे कोणतीच आव्हाने नव्हती आणि सारे काही सुरळीत होते असे मानण्याचे कारण नाही. परंतु त्यांनी हे काम अतिशय चोखपणे केले. संप्रदायातील मंडळींनी हे काम पुढे चालू ठेवले. समता, बंधुत्व आणि सर्वधर्मसमभावाच्या शिकवणुकीतून जवळपास आठशे वर्षे या संतांनी मार्गदर्शन केले. त्यासाठी वापरलेली मराठी भाषा वेगवेगळ्या स्वरूपातील असली आणि त्यावर त्या त्या काळाचा प्रभाव असला तरी सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या सर्वानी केले हे नाकारता येणार नाही.

जवळपास शंभर वर्षांची पार्श्वभूमी असणाऱ्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठीतून होणारा परस्परसंवाद अत्यंत महत्वाचा ठरला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून, सहभागी साहित्यिकांकडून हा संवाद होत राहिला. बहुतेकांनी ही प्रथा गंभीरपणे पाळली, कालानुरूप प्रश्नांचा उहापोह केला, हे मान्य करायला हवे. साहित्य संमेलनादरम्यान होणारी पुस्तकविक्री व त्याचे आकडे हा वेगळाच विषय असला तरी जुन्या आणि ताज्या  दमाच्या साहित्यिकांचे साहित्य हजारो वाचकांपर्यंत पोचत आहे, यापेक्षा कोणताही परस्परसंवाद मोठा म्हणता येणार नाही.
तरीही भाषा हे परस्परसंवादाचे साधन नवनवीन तंत्रज्ञानामुळे गेल्या पन्नास पंचाहत्तर वर्षात झपाट्याने बदलत गेले हे आपल्याला दिसते आहे. भाषेचे प्रगटीकरण किंवा भाषा व्यक्त करण्याची साधने बदलत गेली. वर्तमानपत्र आणि मासिके अथवा साप्ताहिक यापुरते मर्यादित असलेले साहित्य नंतर विविध पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ लागले. दूरचित्रवाणी असो , एक जानेवारी १९८३ या रोजी आलेले इंटरनेट असो अथवा आताचा मोबाईल असो, भाषा हे परस्परसंबंधाचे/ संवादाचे  माध्यम विविध प्लॅटफॉर्मवरून वापरले जाऊ लागले. ही माध्यमे आपोआप बदलत गेली. जगाच्या कोपऱ्यात घडलेली बातमी क्षणार्धात जगाला कळायला लागली. बातमी व तिचे विश्लेषण लगेच लोकाना वाचता येऊ लागले. त्यामुळे साप्ताहिके/ पाक्षिके यांचा खप कमी झाला. जसजसा काळ बदलू लागला तसतसा मराठी माणसाकडून मराठी भाषेचा वापर कमी होत गेला हे कितीही दुर्दैवी वाटत असले तरी ते आज सत्य म्हणून आपल्याला स्वीकारावे लागेल. लहानपणापासून इंग्रजी भाषेमधून  शिक्षण किंवा परदेशातले वास्तव्य यामुळे मराठी बोलण्याचे प्रमाण कमी होत आहे हे नाकारून चालणार नाही. इंग्रजी भाषा शिकणे ही बाब आज अनिवार्य असली तरी मराठीकडे दुर्लक्ष होता कामा नये, हे वाक्य फक्त भाषणात बोलण्यापुरते मर्यादित राहिले आहे, हेही आपण जाणतो. इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठीत बोलताना इंग्रजी शब्दांचा वापरही व्हायला लागला, काही वेळा तो इतका वाढला की, ‘एकतर मराठीत बोल किंवा इंग्रजीतून बोल’, असे म्हणण्याची पाळी आली.  भाषा ठराविक कालावधीने बदलत राहते हे मान्य. इतर भाषेतले अनेक शब्द मूळ मराठीच वाटावेत इतक्या बेमालूमपणे मराठी भाषेत मिसळून गेले आहेत हे खरे असले (आणि ते स्वागतार्ह असले तरी) मराठी भाषा एवढी लवचिक व्हायला नको की तिचा मूळ गाभाच हलला जाईल.

असे म्हणतात की (२०११ च्या जनगणनेनुसार ) सुमारे चौदा कोटी लोक मराठी भाषक आहेत. हा आकडा छोटा नाही.  पुढील जनगणना अजून व्हायची असल्यामुळे 2026 मध्ये हा आकडा नेमका किती आहे हे सांगणे कठीण आहे. परंतु मराठी भाषक असणे वेगळे आणि परस्परसंवाद करताना रोजच्या जगण्यात, बोलण्यात मराठी भाषेचा वापर करणे वेगळे. एकीकडे मराठी शिक्षणाचे मूळ असणाऱ्या शाळा बंद पडत चालल्या  आहेत आणि त्यामुळे नवीन पिढी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेत आहे.  त्यांचे मराठी कच्चे रहात आहे हे आपण बघतो. पण मी या पिढीला दोष देत नाही.  जबाबदार आहेत ते त्यांचे पालक आणि इंग्रजीला पर्याय नाही,  मराठीऐवजी इंग्रजीला प्राधान्य ही त्यांची भूमिका!  इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे यात नाकारण्यासारखे काहीही नाही, परंतु मराठी भाषकांची  जी अवस्था आज झाली आहे तिला कारणीभूत आपणच आहोत. परस्परसंवादाचे माध्यम ही इंग्रजी (आणि मुंबईसारख्या महानगरात हिंदी) भाषा होत आहे हेही आपल्याला नाकारून चालणार नाही. केवळ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषा कायम १४ कोटीपेक्षा अधिक लोक वापरतील अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा अभिमान हा स्वाभाविकपणे माझ्यासह प्रत्येक मराठी माणसाला आहे आणि तो असायलाच हवा. परंतु रोजच्या वापरात जर मराठी कमी होत असेल तर ती का कमी होत आहे याचा गंभीरपणे विचार कुणी करणार आहे का हा खरा प्रश्न येतो. दोन मराठी माणसेही हिंदीतून बोलण्यास प्राधान्य देणार असतील तर मग काय करायचे? मराठी भाषा इतर भाषेतील शब्दाना सामावून घेते हा इतिहास असला तरी वर्तमान भकास असू नये एवढीच इच्छा आहे.

इंटरनेट युगाच्या सुरुवातीच्या काळातही सारा भर इंग्रजी भाषेवरच होता. परंतु हळूहळू मराठी भाषेतील वेबसाईट्स आणि इतर माहिती (डाटा) लोकांसाठी उपलब्ध झाला आणि माहितीचा प्रचंड मोठा स्त्रोत आपल्याला मिळाला. वैयक्तिक स्वरूपाच्या वेबसाईट, संस्थात्मक स्वरूपाच्या वेबसाईट, वर्तमानपत्र आणि नियतकालिकांच्या वेबसाईट आणि इतर अत्यंत उपयुक्त माहिती देणाऱ्या असंख्य वेबसाइट्स आज मराठीतून आहेत याचा अभिमान आपल्याला प्रत्येकाला वाटेल. या वेबसाईट हे सुद्धा परस्परसंवादाचे एक माध्यम झाले आहे. जग जसजसे पुढे चालत आहे तसतसे हे माध्यम अधिकाधिक प्रगल्भ होत आहे असे मला वाटते. 

कोणे  एके काळी एका गावाहून दुसऱ्या गावात संदेश पाठवायचा असेल तर पत्र लिहून पाठवावे लागायचे. ते मिळाल्यावर त्याचे उत्तर येण्यात बराच कालावधी जायचा. परंतु पत्रलेखन हे परस्पर संवादाचे प्रमुख साधन होते. मित्रमंडळी अथवा नातेवाईकांना  हाताने पत्र लिहिताना  त्यात आपल्या भावनाही उतरायच्या. पत्र अधिक जिवंत व्हायचे हा अनुभव आपण अनेकांनी घेतला असेल. तुम्ही अशी निवडक पत्रे आजच्या व्हॉट्सअप जमान्यातही जपून ठेवली असतील किंवा अनेकजण अजूनही असे पत्रलेखन करत असतील. जेव्हा घरी लँडलाइन टेलिफोन आले तेव्हाही आधी ट्रंक कॉल, मग एसटीडी आणि आता थेट कॉल अशी आपली मजल गेली.  संवाद पत्रापेक्षा खूप वेगवान झाला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही या लँडलाइन फोनचे महत्त्व निश्चितच आहे. आता मुंबईत अथवा मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त रहात असलेल्या चाकरमान्याला या ‘गावाकडच्या’ फोनकॉलचे फार अप्रूप असायचे. आता  शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मोबाईल नेटवर्क पोचलेले आहे. भारतात आताच जवळपास ८० कोटी लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचलेले आहे.  त्याचा वापर हा परस्परसंवादासाठी (फारच जास्त) व्हायला लागला. संवाद अतिवेगवान झाला.  अलीकडेच आलेली समाजमाध्यमे, गुगल आणि इतर सर्च इंजिन्स, यूट्यूबसारखे माध्यम आणि त्यांचा वापर करून निर्माण झालेली इतर अनेक प्रसारमाध्यमे यांचा वापर मराठीजनही करू लागले. भारतात १९९५ साली मोबाईल सेवा सुरू झाली. म्हणजे आता या सेवेला तीन दशके झाली आहेत.  मोबाईलशिवाय आपण कसे जगत होतो असा प्रश्न अनेकांना पडत राहिला आहे. 
 
समाजमाध्यमांवरून वेगवेगळ्या इमोजी वापरून आपल्या भावना व्यक्त करणे हे खरे ‘यांत्रिकीकरण’ झाल्यासारखे वाटते, तरीही ते आता अपरिहार्य आहे आणि त्यामुळे माणसाच्या मनातील खरी भावना नेहमी लपून राहते आहे असे मला वाटते. कारण तुमच्या बोलण्यामध्ये ज्या भावना असतात त्या, लिखित पत्रामध्ये किंवा लिखित संदेशांमध्ये ज्या भावना असतात त्याच्यापेक्षा या इमोजी (पटकन काम करत असल्या तरी) प्रभावी काम करतात का आम्हाला याबद्दल मला शंका आहे. 

आज मराठी माणूस महाराष्ट्रापुरता अथवा देशापुरता सीमित  नसून परदेशातही मोठ्या प्रमाणावर रहात आहे. त्या अर्थाने मराठीचा प्रसार जगभर झाला असे म्हणता येईल. जगाचा विचार नंतर करू परंतु महाराष्ट्राची आज जवळपास १३ कोटी लोकसंख्या आहे. त्यात मूळ मराठी माणसाचा विचार केला तर विविध जिल्ह्यांमध्ये आणि भागांमध्ये मराठी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते, प्रत्येक ठिकाणचा गोडवा काही वेगळाच आहे. हे सारे समाजमाध्यमांद्वारे लोकांपुढे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.  दर  काही कोसांवर भाषा बदलते असे म्हणतात ते खरे आहे. त्यामुळे एका ठिकाणची मराठी चांगली/शुद्ध  आणि दुसऱ्या ठिकाणची मराठी कमी दर्जाची असे कधीही म्हणू नये. प्रत्येक प्रांतातील मराठीचे स्वतंत्र स्थान आज इतक्या वर्षानंतरही कायम आहे. त्या त्या बोली मध्ये आज उत्तम साहित्यनिर्मिती होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.  इतर भाषेतील साहित्य मराठी भाषेमध्ये आणून लोकांना त्याची जाणीव करून देण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, परंतु मराठी भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये भाषांतरित होऊन किती प्रमाणात पोहोचते याबद्दल मात्र मनात शंका आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलली जाणारी मराठी भाषा स्वतःचे अस्तित्व टिकवून  असली  तरी परस्परसंवादाचे साधन म्हणून आज समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे हे मान्य करायला हवे. त्यामुळे अर्थात काही प्रमाणात तोटाही जाणवतो आहे. माणसामाणसातील परस्पर संवाद (थेट संवाद) कमी होऊन केवळ समाजमाध्यमांच्या द्वारे देवाण-घेवाण होणाऱ्या इमोजीपुरता मर्यादित आहे की काय असे वाटायला लागले आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देणारा मराठी माणूस  आणि अमराठी माणूस यात काही फरक उरला आहे असे वाटत नाही.

इमोजी लोकप्रिय होण्याचे कारण सहज कळू शकते. शब्दांपेक्षा चिन्हाद्वारे संदेश लवकर आणि थेट पोचतो. विविध चिन्हे  परस्परसंवादाची अत्यंत प्रभावी माध्यमे असतात. एखादी  अशिक्षित व्यक्ती  भारतातून निघून परदेशातील त्यांच्या मुलांकडे एकटी जाऊ शकते ती  इंग्रजी भाषेचाच नव्हे तर शिक्षणाचा जवळपास पूर्ण अभाव असतानाही, कोणाच्याही मदतीशिवाय.  विमानतळावरील विविध मार्गदर्शक चिन्हांच्या आधारे. चिन्हांकडे बघूनच तिचा प्रवास होतो. हे कशामुळे झाले? तर चिन्हे शब्दांपेक्षा आणि भाषेपेक्षा अधिक प्रभावी ठरली म्हणून. त्याचाच परिणाम म्हणून समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना अथवा व्यक्त होताना विविध चिन्हांचा वापर होऊ लागला आणि लिखित पत्रव्यवहार कमी होऊ लागला. केवळ टपाल खात्याला फटका बसला असे नाही तर माझ्या मते परस्परसंवाद साधू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा फटका बसला. मोबाईलमुळे अथवा ईमेल सेवेमुळे संदेश इच्छित स्थळी ताबडतोब जायला लागले आणि त्याचे उत्तरही पटापट यायला लागले हा जरी फायदा असला  तरी त्याने परस्परसंवादाचे माध्यम मोठ्या फरकाने बदलले हे मान्य करायला हवे. अर्थात पटापट फॉरवर्ड करण्याच्या अथवा झटपट प्रतिक्रिया देण्याच्या नादात भलतीच इमोजी गेल्याने होणारे गोंधळही वाढले हेही तितकेच खरे. इमोजी मराठीच नव्हे तर सगळ्याच भाषांच्या पलीकडे गेली. त्याचवेळी मराठी समाजमनाला रुचतील अशा इमोजी फोनमध्ये आल्या, त्यामुळे संवाद अधिक नेमका झाला हे खरे.

कोणत्याही भाषेत स्थित्यंतरे होत असतात तशी ती मराठी भाषेतही झाली. यापुढेही होत राहतील. ही प्रक्रिया अपरिहार्य आहे. परंतु ती भाषा वापरताना परस्परसंवादाची माध्यमे (विशेषतः गेल्या तीन दशकांत ) ज्या वेगाने बदलत गेली त्याचा आढावा घेतला तर आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. आता कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) नावाचे भूत सर्वांच्या डोक्यात शिरले आहे. स्वतः विचार करू नका, सारे काही आमच्यावर सोपवा असे सांगणारी ही ‘बुद्धिमत्ता’ पुढच्या पाच वर्षांत कोणत्या दिशेने जाणार आहे हे सांगणे कठीण आहे. त्या झंझावातात मराठी भाषा वेगळेच स्वरुप धारण करणार आहे, हे निश्चित. परस्परस्वंवादाचे पूर्णतः यांत्रिकीकरण होऊ नये आणि माणसाचा यंत्रमानव होऊ नये एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो, दुसरे काय?
 
(हा लेख 'ऋतुगंध'च्या चैत्रपाडवा नववर्ष विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे. अंकाचे संपादक सुनील पाटोळे असून कार्यकारी संपादक विवेक तेंडुलकर आहेत. अतिथी संपादक म्हणून सीए (डॉ) केतन जोगळेकर यांनी काम पाहिले आहे. अंकाची देखणी मांडणी स्वरा फीचर्स ने केली असून मुखपृष्ठावरचे छायाचित्र स्मिहा पाटोळे हिचे आहे)





टिप्पण्या

  1. मराठी माणसेच सामाजिक माध्यमांच्या समुहांवरही मराठीतून संवाद साधत नाहीत. निदान आपल्या मराठी कुटुंबांच्या समूहावर मित्र मिळणे मित्र-मैत्रिणींच्या समूहावर तरी आपण पूर्णपणे मराठी संवाद साधू शकू पण तेही केले जात नाही. तेवढ्या जरी केलं तरी सुद्धा मराठी भाषा जगवण्यासाठी प्रत्येकाकडून प्रयत्न केल्याचं निमित्त मिळेल आणि पुढच्या पिढीला ही संवाद कळू शकतील

    उत्तर द्याहटवा
  2. ह्या लेखातून मानवी संस्कृतिक विकासाचे एक परिमाण पुढे आले आहे. माणूस सुरुवातीला रेघोट्या त्यातून चित्रे आणि नंतर चित्रलिपी चा वापर सांस्कृतिक विकासाच्या विविध टप्प्यावर करत आला आहे. ध्वनी मध्यम म्हणजे श्रवण माध्यमातून तो रेघोट्या स्वरूपातील लिखित किंवा दृश्य माध्यमाकडे आला. सौंदर्य व अर्थातील स्पष्टता व नेमकेपणा ह्याची अधिकाधिक गरज , बसल्याने हळू हळू मानवाने जाणीवपूर्वक नसले तरी सुद्धा चित्रलिपी विकसित करण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. ध्वनींच्या कंपनानुसार तो ध्वनीला एक आकार देऊ लागला. ज्या प्रमाणे ecg काढला जातो काहीशी तशीच ही क्रिया घडू लागली अजाणतेपणे . ताल रक्षक तबल्यावर बोल काढतो तेव्हा त्याचे शरीर एका हालचाल हावभाव करत असते ते त्या ध्वनी मुळे ती जी ठसठशीत क्रिया असते ती खोलवर सूक्ष्मपद्धतीने ध्वनीचे आकार तयार करते त्यातून भौगोलिक प्रदेशानुसार आकार म्हणजे अक्षरे तयार होऊ लागली/झाली. अनेक गोष्टी एकचवी होऊ लागल्या म्हणून विकासाचा टप्पा. त्यातून व्यक्त होण आणि ते भिडणं ह्यातून पुढे भाषाशास्त्र विकसित झाले त्याचा परमोच्च बिंदू म्हणजे सविस्तर लिखाण जे अर्थ व आनंद देईल . हा कोणत्याही भाषेच्या विकासाचा सर्वोच्च bidu. पण व्यावसायिकतेने हे मोडीत काढायला सुरुवात केली ती शिरतं व टायपिंग ने त्याचा पुढचा टप्पा ईमोजी ते ही ईमोजी ही वाढ ले. लक्षात घ्या आता संवाद ही कमी वर्णन कमी ३ या ऐवजी दोन अंकी नाटक भाषा वापर्कमी म्हणू उतार तिचा प्रवास.
    सुहास गोवा

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तम लेख आणि उत्तम , काही नवीन माहिती. काही जुन्या गोष्टी उगाळल्या गेल्या. इतर भाषा, नवीन तंत्रज्ञान ह्याला विरोध नक्कीच नाही. पण आपल्याच मातृ भाषेचा आपण च अभिमानाने वापर आणि प्रसार करायला हवाच. नव्या शिवाय पुढे प्रगती शक्यच नाही. इंग्रजीत म्हणतात तसे ONLY CHANGE IS CONSTANT … बदल हा सतत होत असतो आणि तो अमलात आणावाच! गावानुसार भाषा बदलते म्हणतात !

    मला आठवतं , पदवी परीक्षेला मी " मराठी वाङ्मय.. marathi literature - हा विषय आवडीने, अभिमानाने घेतला होता आणि आख्या कॉलेज मध्ये आम्ही फक्त 2 विद्यार्थ्यांनी तो निवडला होता!

    मराठी भाषा किती जुनी हे माहीत नाही, पण देवनागरी, मोडी , वर्ण माला ही नक्कीच फार पूर्वी पासून अस्तित्वात असावी. आपले पुराण ग्रंथ , रामायण, महाभारत, भगवत गीता वगैरे मूलतः कुठल्या लिपीत / भाषेत असतील?

    असो ... धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा