कथा माता, बालकांच्या उत्कर्षाची... (पूर्वार्ध)
आपल्या देशात ग्रामीण महिला हा आजपर्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेला घटक आहे. तिच्या समस्या व त्यांवरील उपाययोजना यांवर आजपर्यंत काही परिणामकारक कार्यवाही झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर १९७८पासून या महिलांवर एक डॉक्टर म्हणून उपचार करताना त्यांच्या भावविश्वाची मला ओळख होऊ लागली. मूकपणे लाथा-बुक्क्यांचे उन्हाळे सोसत, वेदनांचे सोहळे करून, वरवर हसतमुखाने जगणाऱ्या या महिलांना जमेल तसा आधाराचा, मदतीचा हात दिल्याशिवाय मला चैन पडेना, सुखाने जगता येईना. ही टोचणी, ही अस्वस्थता प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय कमी होणार नाह याची खात्री झाली आणि महिला सबलीकरण हा शब्द अजून अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून मी या समविचारी महिलांसोबत ग्रामीण महिलांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी परिवर्तन चळवळीचे काम सुरू केले. सुदैवाने या कामाला तळमळीने काम करणारे हात आणि कामाचा परीघ आपुलकीने वाढवणारे बुद्धिमान लोक मला मिळाले आणि ग्रामीण महिलांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडून येताना दिसू लागले हे स्वागतार्ह बदल नागरी समाजातील बुद्धिमंत, धोरणे ठरवणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचावेत, ग्रामीण स्त्रियांचे आयुष्य त्यांच्या मनातील स्वयंप्रकाशित ज्योत उजळून, आसपासचा परिसर त्यांच्या कांकणे भा हातांमधील ज्योतींनी उजळून निघावा, यासाठी हा लेखनप्रपंच ! विठूराया, या अनुभवांच्या वाचनाने ग्रामीण महिलेला सबळ करणारे मनगट आणि मेंदू मिळवून दे ही तुझ्या चरणी प्रार्थना !
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावात 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' हा उपक्रम शून्यातून उभारणाऱ्या आणि हजारो माता / बालके यांची आई झालेल्या डॉक्टर संजीवनी केळकर यांचे हे मनोगत आहे. आपल्या समाजात विविध आर्थिक /सामाजिक स्तरावरचे विविध जातींचे लोक आहेत. या लोकांच्या समस्या सर्वांना दिसत असतात, प्रश्न सोडविण्याची इच्छाही असते, परंतु शेवटी 'आपण कशाला भानगडीत पडा, त्यांचे ते बघून घेतील हीच भूमिका स्वीकारली जाते. पुण्याच्या डॉक्टर संजीवनी गोडबोले लग्नानंतर डॉक्टर संजीवनी केळकर झाल्या आणि सांगोला इथे आल्या. त्यांनी मात्र 'आपल्याला काय त्याचे' असा दृष्टिकोन स्वीकारला नाही. त्यांच्याकडे रुग्ण म्हणून येणाऱ्या महिलांची असहाय स्थिती त्यांनी पाहिली आणि केवळ वैद्यकीय उपचार न करता त्या महिलांचा सर्वंकष उत्कर्ष झाला पाहिजे असे ठरवले. नुसते मनात ठरवले नाही, तर त्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करून ते पूर्णत्वासही नेले. हे प्रयत्न कसे सफल झाले, त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या, आज ते काम कोणत्या टप्प्यावर आहे आणि त्याचे भवितव्य काय या साऱ्यांची कहाणी म्हणजे 'देवराई' हे पुस्तक. पुस्तकाच्या लेखिका सौ. मुग्धा फडके मुंबईकर आहेत, परंतु त्याना 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान'बद्दल कळल्यावर हे सारे शब्दबद्ध करायला हवे आणि संजीवनीताईंचे काम राज्यभर जायला हवे असे प्रकर्षाने वाटले. सौ. मुग्धा फडके यांचे स्वतःच्या लिखाणाचे एक पुस्तक या आधी प्रसिद्ध झाले असले तरी संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणारे हे पहिले स्वतंत्र पुस्तक आहे. परंतु ते पहिलेच पुस्तक आहे असे वाटत नाही, इतके नेमके आणि संस्थेचे मर्म व कर्म थेटपणे वाचकांपर्यंत पोचवणारे झाले आहे. ते मूळातूनच वाचायला हवे. पुण्याच्या देशमुख आणि कंपनी या अत्यंत नामवंत प्रकाशन संस्थेने हे पुस्तक उत्तम पद्धतीने काढले आहे.
पुस्तकाला 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' शी जवळपास दोन दशकांचा संबंध असणाऱ्या डॉक्टर अनघा लवळेकर
यांनी प्रस्तावना दिली आहे. ती इथे देत आहे. दुसऱ्या भागात स्वतः संजीवनीताई आणि लेखिका सौ. मुग्धा फडके यांचे मनोगत वाचायला मिळेल.
देवराईचा अंतर्नाद
एखादे रुक्ष माळरान असावे... वर्षानुवर्षे काही न उगवलेले... निर्बीज. निस्तब्ध... धगधगणारी माती... आभाळाच्या काळ्या मायेची वाट बघणारी... काही दशकांच्या प्रतीक्षेनंतर अचानक दाटून आलेल्या मेघांनी तीवर भरभरून वर्षाव करावा आणि बघता बघता त्या माळरानाचे रुपडे बदलून जावे... अनेक झाडांनी-वेलींनी त्या जमिनीला वेढून टाकावे आणि त्यांच्या खांद्यावर बागडणाऱ्या पक्ष्यांनी आपल्या मंजुळ नादाने त्या देवराईचा गाभारा भरून जावा...
असेच काहीसे घडले आहे... सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या छोट्याशा तालुकावजा गावात... इथल्या महिलांच्या आयुष्यात...! विधायक सामाजिक बदलांपासून अनेक वर्षे वंचित असलेल्या या गावात १९७२ साली पुण्यासारख्या त्या वेळीही पुरोगामी असणाऱ्या गावातून डॉ. संजीवनी गोडबोलेची डॉ. संजीवनी केळकर बनून एक तरुणी येते काय आणि ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या एका लोक-देवराईची बीजे पेरते काय... रुग्णसेवा करता करता शरीरासोबत महिलांच्या. लहानग्या मुलांच्या मनांवरही हळुवार फुंकर घालत कुणाची संजूताई. कुणाची केळकर बाई बनते काय... पन्नास वर्षांचा एक समृद्ध कर्मवारसा उभा करते काय... हा सारा प्रवासच अतिशय लोभस आणि प्रेरक आहे!!
डॉ. संजीवनी तथा संजूताई केळकर आणि त्यांच्या मातीशी जोडलेल्या सर्व सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या या संस्थेच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाची ‘देवराई’ ही खिळवून ठेवणारी कहाणी आहे. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. सहसा. अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन. अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान हे सांगोला भागातील असेच एक लोकसहभागातून निर्माण झालेले कृतिशील अभयवन आहे. संपर्कात आलेल्या पीडित महिला. निर्व्याज मुले यांना भक्कम आधार पुरवणारे आणि सुरक्षित भविष्याची पाऊलवाट रेखून देणारे...!
ग्रामीण महिलांना आत्मभान देणे हे ‘बोलाचीच कढी’वाल्यांचे काम नव्हे याचा प्रत्यय या कहाणीत वारंवार येतो. विख्यात स्त्रीवादी लेखिका-कवयित्री कमला भसीन यांनी म्हटल्याप्रमाणे-
पहाड सी मुसीबतोंके के बीच आगे बढ पाने का नाम औरत है ।
दहाडती नसीहतोंके बीच अपना कह पानेका नाम औरत है ।
महिलांमध्ये एक सिंहगर्जना दडलेली असते. जेव्हा एखादी पहाडासारखी विपरीत परिस्थिती अंगावर कोसळते तेव्हा तिच्यातील निसर्गदत्त धैर्य जागे होते... गरज असते ती तिला ते आत्मभान देण्याची. पारूसारखी कुणी दुर्दैवी सखी हे समजण्याच्या आतच बळी जाते आणि त्यातून उभी राहते या संस्थेच्या अन्याय निवारण समितीची अखंड उजळती मशाल! या सातत्यपूर्ण मजबूत आधारामुळे सांगोला भागातील शेकडो सख्यांना स्वतःच्या दुर्दैवाशी झुंजण्याचे बळ मिळाले आहे. महिलेला केवळ संघर्षाची वाट दाखवणे पुरेसे नसून तिच्या ओंजळीत अर्थबळ येणेही तितकेच आवश्यक आहे हे उमजून बचत गटांपासून ते स्वयंरोजगार निर्माण करण्यापर्यंत मोठा पट उभा केला आहे. एखाद्या लीलाची दारुड्या नवऱ्यापासून पाठराखण करण्यापासून ते एखाद्या शीतलचे नाव सातबाऱ्यावर चढवून तिला सन्मानाने जमिनीची मालकीण बनण्यासाठी हात दिला आहे. अनेकींना नवनवीन कौशल्ये शिकवून पुढच्या जगण्याची शिदोरी दिली आहे. अगदी घरगुती पदार्थांपासून त्या परिसराचे वैशिष्ट्य असणाऱ्या घोंगडी उत्पादनापर्यंत अनेक उद्योग-व्यवसायांचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उत्पादन संस्थेच्या दूरदृष्टीने झाले आहे.
कुटुंब हा समाजाचा खरा कणा आहे याची पक्की खात्री असल्याने संजूताईंनी मातेइतकीच बालकांच्या मुलभूत गरजांची. हक्कांची जपणूक महत्त्वाची मानली आणि त्यातून हळूहळू विकसित होत गेले आहे उत्कर्ष विद्यालय... येथील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांनी अफाट कष्ट घेतले आहेत. त्याची शुभचिन्हे आता कित्येक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि व्यावसायिक यशातून उमटत आहेत...
यांतील प्रत्येक कहाणी विकासाचा. जाणीवजागृतीचा. वाढणाऱ्या आत्मभानाचा एक जिताजागता दाखला आहे. संघटन ही याची अंतःसूत्री आहे तर जिव्हाळा हे त्याचे प्रकट रूप आहे. ऋग्वेदातील एका सूत्रात इंद्रपत्नी शचीने स्वतःबद्दल म्हटले आहे. ‘अहं केतुरहं मूर्धाहमुग्रा विवाचनी।’ म्हणजे मीच सर्वाच्या मूर्धन्य स्थानी आहे. मी उग्रा (अन्याय सहन न करणारी). विवाचनी (तर्कशुद्ध न्यायनिवाडा करणारी) आहे. प्रारंभापासूनच डॉ. संजीवनीताईंच्या रूपाने अशीच कणखर. तरीही सर्वांना सांभाळून घेणारी आणि विवेकबुद्धीने सर्वांना आपल्या पंखाखाली घेणारी अग्रणी कार्यकर्ती-नेता या कामाला लाभली आहे. नेता असूनही सहकाऱ्यांमध्ये स्वतःला विरघळवून टाकणारी त्यांची वृत्ती आहे म्हणूनच कथेत म्हटल्याप्रमाणे ज्योतीने ज्योत उजळत गेली आहे. हे काम परमेश्वरी इच्छेने. समाजप्रामाण्य वृत्तीने करायचे आहे हे मनातील अधिष्ठान. भोवती जमलेल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचा स्वयंप्रेरित संच. त्यांच्या उत्तम सहमेळ– त्यातून अपरंपार कष्टांनी उभे राहिलेले अनेकानेक विकासकेंद्री प्रकल्प. केळकर कुटुंबीयांचा सक्रिय पाठिंबा. आवश्यक साधनसामुग्री. आणि शेकडो मनांचे- हातांचे अथक सायास यांची मांदियाळी या सर्वांच्या भोवती उभी राहिल्यावर दैव अनुकूल झाल्याशिवाय कसे राहिले असते?
कुठल्याही घराण्याचा / राजकीय परंपरेचा / आर्थिक साम्राज्याचा काडीमात्रही वारसा नसताना केवळ समाजबदलाची प्रखर इच्छा आणि निरलस वृत्तीने केलेल्या तपश्चर्या या बळावर हे काम उभे राहिले आहे. वाढले आहे आणि अधिकाधिक कालसुसंगत (relevant) होत आहे. आजच्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत जाणाऱ्या सामाजिक समस्यांना असे स्वायत्त. स्व-तंत्र ‘स्वयमेव मृगेन्द्रता’ असणारे आणि तरीही समाजशरणता जपणारे कामच दीर्घकालीन उत्तरे उभारू शकते यात शंका नाही.
डॉ. संजीवनी केळकर आणि माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचा माझा परिचय उण्यापुऱ्या पंधरा-वीस वर्षांचा आहे. ज्ञान प्रबोधिनीशी त्यांचा आत्मीय संबंध राहिला आहे. येथील अनेक उपक्रम त्यांनी आवर्जून उत्कर्ष विद्यालयामध्ये मुलांसाठी राबवले आहेत. त्या निमित्ताने आजवर खिडकीतून डोकावणाऱ्या एखाद्याच कवडशाला पाहून कौतुकावे इतपतच या सर्व कामाची तोंडओळख झालेली होती. ‘देवराई’ वाचताना मात्र या कामाची मुळे किती खोलवर गेलेली आहेत आणि त्याने किती जणांवर छायेची पाखर धरलेली आहे याचे विस्मित करणारे दर्शन झाले. या कहाणीवरील पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचा आत्मीय आग्रह आदरणीय संजूताईंनी माझ्यासारख्या वयाने. अनुभवाने. खूपच लहान असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्तीकडे धरावा यात माझी कार्यप्रेरणा अधिक बळकट व्हावी हाच परमेश्वराचा अंतस्थ हेतू असणार असेच मला मनापासून वाटते.
लोकमान्यता. राजमान्यता. सर्व काही लाभूनही त्यातून सहजी येणाऱ्या कार्यतृप्तीचे वरवरचे समाधान न मानता ‘अजुनी चालतोची वाट’ या ब्रीदाला जागून संस्थेची ही देवराई फुलतच जाणार आहे. तिचा अंतर्नाद अधिकाधिक मंजुळ आणि लोभस बनणार आहे कारण पुढच्या पिढीच्या कार्यकर्त्यांनी हा वसा तितक्याच निष्ठेने हाती घेतलेला आहे...
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानला या सर्वासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि या व्रताची जपणूक परमेश्वरी शक्तीने करावी अशी मनोमन प्रार्थना...
डॉ. अनघा लवळेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा