आईची आई होताना...
क्षितिजा करमरकर आणि डॉ. सायली नातू
कोणत्याही सामाजिक व आर्थिक स्तरातील स्त्री असो, तिला तिच्या पहिल्या बाळाची चाहूल लागली की मनात विलक्षण आनंद आणि त्याचबरोबर बाळाची काळजी हे दोन्ही एकाच वेळेला दाटून येते. बाळ पोटात असतानाचे नऊ महिने आणि नंतर त्या बाळाचा जन्म आणि बाळाचे हळूहळू मोठे होत जाणे हा काळ अतिशय आनंददायी असला तरी प्रत्यक्ष त्या स्त्रीला त्या सगळ्या दिव्यातून जाताना मनात अनेक प्रश्न येत असतात. त्याची उत्तरे प्रत्येकीला मिळतातच असे नाही. अशा वेळेला आई किंवा सासूबाई किंवा कोणी ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शक म्हणून असली तर फायदा होतो हे खरे असले तरी कोणी समवयस्क स्त्रीने तिचे अनुभव शेअर केले तर मनाला उभारी येते. अशीच एक उत्तर अमेरिकेत राहणारी तरुणी जेव्हा पहिल्या बाळाच्या चाहुलीने आनदित झाली, तेव्हा सगळे काही नीट होईल ना अशा काळजीतही पडली. तिचे आई-वडील आणि सासुबाई या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्याच. परंतु तरीही पहिल्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणींनी एकत्र येऊन एकमेकींना आधार द्यावा ही कल्पना तिच्या मनात आली आणि ती तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीला बोलून दाखवली . या मैत्रिणीला तेव्हा आठ महिन्यांचा मुलगा होता. ती गर्भारपण, बाळंतपण व आईच्या प्रक्रियेतून नुकतीच गेली असल्यामुळे तिचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. परंतु हे असे मार्गदर्शन दोन मैत्रिणींमध्येच मर्यादित ठेवण्याऐवजी या अवस्थेतून जात असणाऱ्या सगळ्याच तरुणींना त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने या दोघींनी Marathi Aai Initiative अशा नावाने एक उपक्रम सुरू केला.
त्याआधी त्यांनी 'मराठी आई ऑफ नॉर्थ अमेरिका' हा एक
व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला. केला आणि अपेक्षा अशी होती की आई बनवण्याच्या
प्रक्रियेत असणाऱ्या दहा तरुणी जरी एकत्र आल्या तरी त्या एकमेकांना उत्तम
मार्गदर्शक ठरतील. तसा व्हॉट्सऍप ग्रुप स्थापन
झाला परंतु हा आकडा दहापुरता मर्यादित राहिला नाही. कारण या ग्रुपची
चर्चा सर्वत्र होत राहिली आणि आजच्या घडीला या ग्रुपमध्ये १५००पेक्षा अधिक
महिला आहेत. स्त्रीला दिवस गेल्यापासून ते बाळाच्या जन्मानंतरही सर्व
प्रकारचे मार्गदर्शन किंवा सल्ले या ग्रुपमध्ये मिळतात.
महिलांची संख्या जशी वाढत गेली तशी फक्त व्हॉट्सऍप ग्रुपपुरतेच मर्यादित न
राहून चालणार नाही, यापेक्षा मोठे काहीतरी करायला लागेल, हे त्या
दोघींच्या लक्षात आले. मग त्या दोघींनी 'मराठी आई इनिशिएटिव' नावाने एक
विनानफा संस्था चालू केली. नावावरूनच आपल्या लक्षात येईल
या सगळ्या तरुणी मराठी आहेत. त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी जरी पूर्ण
पाठिंबा मिळत असला आणि मार्गदर्शन मिळत असले तरी अशा पद्धतीने एकत्र येऊन
एकमेकांचा आधार बनण्याची ही पद्धत अनेक मुलींना आवडली.
स्वतःला दिवस गेल्यानंतर ज्या तरुणीने या कल्पनेला जन्म दिला तिचे नाव डॉ.
सायली नातू आणि तिच्या मैत्रिणीचे नाव क्षितिजा करमरकर. दोघींच्या
पार्श्वभूमीमध्ये जरी बराच फरक होता. समान धागा होता तो मैत्रीचा आणि
मराठीपण जपण्याचा. डॉ. सायली या अमेरिकेतच जन्मल्या आणि
अमेरिकेतच वाढल्या. याउलट क्षितिजा या महाराष्ट्रात पुण्यात जन्मल्या,
तिथेच वाढल्या आणि नंतर अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थिरावल्या. दोघींमध्ये
मैत्रीचे घट्ट नाते जमले .दोघीही मराठी भाषक. आणि मराठी भाषा, मराठी
संस्कृती याबद्दलचा विलक्षण अभिमान असणाऱ्या. सायली पूर्णपणे
अमेरिकन शैक्षण व्यवस्थेत शिकलेल्या आहेत. तरीही त्यांचे मराठी भाषेवर
विलक्षण प्रभुत्व आहे. त्या मराठी बोलतात तेव्हा अस्सल मराठी वाटतात आणि
इंग्रजी बोलतात तेव्हा उच्चार पूर्णतः अमेरिकन असतात.
उत्तर अमेरिका आणि कॅनडा येथील मराठी तरुणींना 'आई' बनताना मानसिक आधार
मिळावा, मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने हा समूह आता काम करत आहे.
त्यांच्याबरोबर केतकी साठे या खजिनदार म्हणून काम करत आहेत. तर नेहा जोशी
या 'हेड ऑफ प्रॉडक्ट मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्स' ही
जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबरोबर ऋग्वेदा पांडे ,ऋतुजा देशपांडे,
सानिका गोरे, ईशा मुरुगकर, यशदा जाधव आणि श्रुती नामजोशी या कम्युनिटी
व्हॅलेंटियर म्हणून काम करत आहेत. MAI चे काम पाहता प्रत्येक स्वयंसेवकाची जबाबदारी मोठी आहे. ती उत्तम प्रकारे पाळली जाते आहे, असे दिसते आहे.
अलीकडेच युट्युब वर 'द अनुरूप शो' या कार्यक्रमात बोलताना डॉ. सायली नातू यांनी सांगितले की त्यांना दिवस गेल्यानंतर आपल्याच वयाच्या आणखीन कोण कोण तरुणी आहेत आणि रोजच्या रोज लागणारे मार्गदर्शन अथवा शंका समाधान कोण करू शकेल असा प्रश्न मनात आला. इतरानाही हे मार्गदर्शन अथवा मदतीचे हात मिळायला हवेत असे वाटले. तेव्हा त्यांनी क्षितिजा यांना ही इच्छा सांगितली. त्यांनी या कल्पनेला पूर्ण पाठिंबा दिला. यांची मदत घेऊन सायली यांनी व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. त्याचे रूपांतर 'मराठी आई इनिशिएटिव्ह' (MAI) मध्ये झाले आहे. सगळ्याजणी इतक्या ऍक्टिव्ह आहेत ती रात्री तीन वाजता जरी एखादा प्रश्न विचारला तरी लगेच दहाजणी तरी उत्तर देतात, असे त्या सांगतात. ज्यांच्या मुलांचे जन्म झाले आहेत त्यांच्या बालपणाच्या गोष्टी शेअर करणे अथवा विविध प्रकारचे मार्गदर्शन करणे असे सगळे या समूहात चालू असते. समूहात विविध व्यावसायिक सुद्धा असल्यामुळे (कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी कवी / लेखक आहेत, कोणी चित्रकार आहेत) त्याही प्रकारची मदत लागली तर ती सहज उपलब्ध होते.
या समूहाचे एक मासिक निघते त्याचे नाव Aaispire असे आहे. समूहाच्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला तिथे गेल्यावर्षीचा दिवाळी अंक वाचायला मिळतो. त्यातला मजकूर अतिशय उत्तम आहे. मासिकाच्या संपादक ईशा मुरूगकर आहेत. ऋग्वेदा पांडे या वेबसाइट व मॅगझिन टीमचे नेतृत्व करतात. सहसंस्थापक क्षितिजा करमरकर यांनी मासिकाच्या मुखपृष्ठाची रचना हाताने केली आहे. शिवाय श्रुती नामजोशी, शर्मिका कर्णिक, पल्लवी मुरुगकर, यशदा जाधव, मुग्धा कामत आणि स्नेहा नाईक या संपादकीय मंडळात आहेत. कवितासंग्रह, आत्मचरित्र, मनोरंजनात्मक लेख, कुटुंबांगण, ज्ञानकोश अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेखन या अंकात वाचायला मिळते.
वेबसाईटवरून असे दिसते की संक्रांत, दिवाळी, मंगळागौर, मातृदिन, गुढीपाडवा,
भोंडला असे विविध कार्यक्रम एकत्रित येऊन साजरे करण्याचा सतत प्रयत्न
होतो. तसे ते साजरे होत आहेत. आता व्हॉट्सऍप ग्रुपसुद्धा एकच न ठेवता
ज्यांची मुले ज्या वयोगटात आहेत त्या त्या वयोगटांनुसार
मार्गदर्शन मिळते. एका गटात शून्य ते अडीच वर्षे, दुसऱ्या गटात अडीच ते
पाच वर्षे, तिसऱ्या गटात पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांच्या आया एकत्र
आल्या आहेत. कारण मुलांच्या वयानुसार प्रत्येक आईची गरज ही वेगवेगळी असते.
अर्थात त्या एकत्र येऊन आपले अनुभव शेअर करू शकतात.
याशिवाय बुक क्लब, करिअर हब आणि इतर उपक्रमही उत्साहाने राबवले जातात.
परदेशात राहून आपले मराठीपण टिकवण्यासाठी या समूहाने जे काम केले आहे
त्याला तोड नाही. 'माझे लग्न होत असतानाही मी गुरुजींना प्रत्येक कृतीचा
अर्थ तपशीलवारपणे विचारत होते आणि समजून घेत होते. कारण मला माहीत आहे की
आपल्या पुढची येणारी पिढी या सगळ्याचा अर्थ आपल्याला
विचारणार आहे आणि आपल्याला हे सगळे माहीत असले पाहिजे, असे डॉ. सायली
म्हणतात. सायली या डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळून नाह या उपक्रमात अतिशय
सक्रियपणे भाग घेतात. त्या उत्तम कथक नृत्यांगनाही आहेत परंतु आता
त्याचबरोबर एका लहान या मुलीची आई ही सुद्धा भूमिका चोखपणे
बजावत आहेत. क्षितिजा करमरकर यांनी टेक्सासमधून लँडस्केप आर्किटेक्चर या
विषयात मास्टर्स केले. त्या उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्याचप्रमाणे
मराठी संस्कृती आणि कला या विषयातही त्यांना खूप रस आहे.
सुरुवातीला दोघी पण आता किमान १५०० महिलांचे मोठे कुटुंब आता एकत्रितपणे मोठे होत आहे, आपले मराठीपण, मराठी संस्कृती खूप प्रेमाने जपत आहे. आई होण्याच्या प्रक्रियेत असल्यापासून ते मूल वाढवेपर्यंत या आईची आई होण्याचे काम या समूहात सुरू आहे. इथे प्रत्येकजण दुसऱ्या स्त्रीची आई आहे, असेच वाटते. यू ट्यूबवर 'द अनुरूप शो' या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी डॉक्टर सायली यांना (पतिराजांसह) बोलते केले तेव्हा सायली यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समोर आले. 'मराठी आई इनिशिएटिव्ह' (MAI) अशासारखा प्रयोग भारतात, विशेषतः महाराष्ट्रात प्रत्यक्षात येईल का ? असल्यास जरूर कळवा.


स्तुत्य उपक्रम
उत्तर द्याहटवाछान माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाअत्यंत माहितीपूर्ण लेख. तरुण पिढी नव्या काळातील आव्हानंही अशा प्रकारच्या उपक्रमातून समर्थ पणे पेलते आहे हे कौतुकास्पद आहे.
उत्तर द्याहटवा